स्तब्ध राहण्याने प्रश्न सुटणार नाहीत, ते सोडविण्यासाठी प्रयत्नांची असते गरज
कठीण प्रश्न समोर येणे ही जीवनातील नेहमीची घटना असते. प्रश्न सोडवायला तर हवा असतो पण त्यावर मार्ग सापडत नसतो. अशा वेळी स्वस्थ बसावे आणि शांतपणाने विचार करावा, असा सल्ला दिला जातो. शांत बसल्याने मेंदूला विश्रांती मिळते आणि समस्येच्या निराकरणाचा मार्ग लक्षात येतो, असे म्हटले जाते. काही वेळा हा सल्ला योग्य ठरत असला, तरी काही प्रश्नांची सोडवणूक त्वरित करणे आवश्यक असते. अशा वेळी स्वस्थ बसून राहिलात, तर समस्या आणखी तीव्र होते. म्हणजेच, प्रयत्नांतून मार्ग निघतो, स्वस्थ बसून नव्हे.
समस्या प्रत्येकाला असतात. त्यांची तीव्रता कमी-जास्त असू शकते. प्रश्न पडल्यावर त्याचे उत्तर शोधावेच लागते. अर्थात समस्या कशी आहे, यावर ती कशी आणि केव्हा सोडवायची याचा निर्णय आपण घेतो. समस्या असल्यावर शांतपणाने बसून विचार करण्याचा सल्ला दिला जातो. पण वर्तमानकाळातील प्रश्नांबरोबर झुंजताना भविष्याचा विचार करणेही आवश्यक असते. एकाच काळात गुंतून पडलात तर प्रगती थांबते. काही वेळा माणसे परिस्थितीपुढे हतबल होऊन जणू गुडघे टेकतात आणि त्याला नियती किंवा प्रारब्ध म्हणून सोडवणूक करून घेतात. पण जीवनात स्थिर राहता येत नाही. पुढे जाणे म्हणजेच आयुष्य असते.
एका समस्येतच अडकलात तर तुम्ही ती सोडवू तर शकणार नाहीच शिवाय भवितव्याकडे दुर्लक्ष केल्याची किंमतही मोजावी लागेल. त्यामुळे पुढे जात राहणे हा उपाय आहे. आयुष्यात सुख आणि दुःख एकामागे एक येतात. माणसाचा स्वभाव स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गाण्याचा असतो. प्रथम ही सवय बदला. दुःख हा जीवनाचा अटळ भाग असल्याचे स्वीकारा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
चिंता आणि भीतीमध्ये गुंतलात तर वेळ वाया जाण्याशिवाय काही साध्य होणार नाही. या भावनांमुळे मानसिक ताण आणखी वाढून आरोग्यावर परिणाम होतो. दिवसाचे २४ तास सगळ्यांना सारखेच मिळतात. त्याचा उपयोग कसा करावा हे आपल्या हाती असते. त्यासाठी एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेऊ. समजा ही व्यक्ती शिक्षक आहे आणि वेळेचा उपयोग करणे जाणते. या व्यक्तीने नेहमीचे शिकविण्याचे काम केले, एक लेख लिहिला, विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या, काहींना ई-मेलद्वारे उत्तरे दिली आणि हे सगळे करून कुटुंबीयांनाही वेळ दिला. एकच व्यक्ती एका दिवशी एवढी कामे करू शकेल का, असा सूर काही शंकासूर काढतील; पण वेळेचे व्यवस्थित नियोजन केले, तर असाध्य काही नसते हे लक्षात ठेवा आणि वेळेचा पुरेपूर वापर करण्यास शिका.
स्वत:वर नियंत्रण ठेवणे किंवा आत्मसंयम ही यशाची पहिली पायरी असते. भावनेत वाहून न जाता तर्कशुद्ध विचार करून घेतलेले निर्णय फलदायी असतात. विशेषतः कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देताना तर्कबुद्धी महत्त्वाची ठरते. असे करण्यामुळे काही वेळा तुमच्या खऱ्या भावना दडपाव्या लागल्या, तरी विचारपूर्वक बोलणे फायद्याचे असते. स्वत:वर नियंत्रण ठेवलेत तर असाध्य कामेही शक्य होतात.
एकाच वेळी अनेक कामे करू पाहणाऱ्यांना तर स्वसंयमाची फार गरज असते. एखादी समस्या सोडविता येत नसेल तर त्यावर अकारण विचार करण्यात वेळ घालविण्यापेक्षा दुसरे काम सुरू करा. नंतर निवांतपणाने त्या समस्येचा विचार केलात, तर उत्तर मिळून जाते.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आपले प्राधान्यक्रम बदलत असतात. विद्यार्थी असताना शिक्षण हे मुख्य ध्येय असते, तर नोकरी सुरू केल्यावर त्याची जागा करिअर घेते. हेच सूत्र रोजच्या जीवनातही उपयोगी पडते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी आणि त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित केलात, की सगळी कामे ठरविल्याप्रमाणे होऊन दिवस सत्कारणी लागतो. हे सत्र पाळणाऱ्यांना त्याचा अनुभव असेल. पण प्राधान्यक्रम निश्चित नसेल, तर सगळ्या कामांचा विचका होणार हे स्पष्ट आहे. तेव्हा, हा छोटा नियम पाळलात तर सगळी कामे व्यवस्थित होत जातील, याची खात्री बाळगा.
स्वप्ने पाहू नका वगैरे उपदेशाचे डोस पाजले जात असले, तरी प्रगतीसाठी ती आवश्यक असतात. अनेक मोठे उद्योग कोणीतरी पाहिलेल्या स्वप्नांमुळेच आकाराला आल्याचे विसरू नका. पण त्यात तारतम्य बाळगायला हवे. आपल्याला झेपतील अशीच स्वप्ने पाहिलीत तर त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करता येतील.
0 Comments